बीड : आम्ही आमच्या टीकाकारांना कामांतून उत्तर देऊ, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा महायुतीकडून लढवू, असे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा, ते चर्चा करून ठरवले जाईल, असेही पवार म्हणाले. दुष्काळ मुक्तीसाठी आठ जिल्ह्यांत काय करता येईल, यासाठी एक सविस्तर बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका स्पष्ट करताना मराठवाडय़ाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
हेही वाचा >>>अंबानी यांनी भाडेतत्त्वावरील विमानतळांची वाट लावली! अजित पवारांची टीका
विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीत सामील झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या आता चांगल्या ओळखी झाल्या आहेत. केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात निधी मिळवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची आमची भूमिका आहे. राजकारणात काही वेगळा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला लोक टीका करतात पण त्यांना विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्याची आपली पद्धत आहे, असे पवार म्हणाले.
हेही वाचा >>>दुष्काळ मुक्तीसाठी एक लाख कोटी खर्चून पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणणार; बीडच्या सभेत अजित पवार यांची ग्वाही
काहींनी जातीचा उल्लेख केला- मुंडे
शरद पवारांच्या व्यासपीठावरून बोलतांना काही लोकांनी भान सोडले. जातीचा उल्लेख केला आणि माझा इतिहास काढला. माझा इतिहास ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात लिहिला आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी उत्तर देत शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या शरद पवारांच्या व्यासपीठावरून जे बोलले तसे आमचे संस्कार नाहीत, असा निशाणा साधला. ही सभा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर विकासाची, सन्मानाची आणि दुष्काळ निवारणाची असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.