एकीकडे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत असल्याची वारंवार ग्वाही देत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर या पक्षांमध्ये असलेली स्पर्धा एकमेकांचं वर्चस्व असलेली ठिकाणं आपल्या ताब्यात घेण्यामध्ये परावर्तित होताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार आज नाशिकजवळील मालेगावमध्ये दिसून आला असून मालेगाव महानगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. चक्क महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसला रामराम ठोकलेल्या नगरसेवकांमध्ये महापौर ताहिरा शेख यांचा देखील समावेश आहे. या पक्षप्रवेशाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं.

“नुसती भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत”

दरम्यान, यावेळी बोलताना नुसती भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला. “वाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या तरुणांना उभं करण्याचं काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसं काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केलं जात आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीत देखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकार्यांना देऊ इच्छितो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचं काम आपण करू”, असं देखील अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

“आता गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे म्हणून…”

दरम्यान, नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेवकांचे अजित पवारांनी यावेळी कान टोचले. “आपल्याकडून कुठली चूक होऊ देऊ नका. कायद्याचं, नियमाचं उल्लंघन होणार नाही, ही खबरदारीही आपण घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलोय, गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपले आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत असं म्हणाल. आम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेनं खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्यायला हवी. आता तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar welcomes 28 corporators mayor of malegaon congress in ncp pmw