आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. विविध पक्षातील नेते, स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत. तर, काही ठिकाणी विशेष लोकांसाठी खास छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. अजित पवारांनीही काल विविध ठिकाणी भाषणं केली. परंतु, यावेळी त्यांच्या भाषणात अनेक वादग्रस्त वक्तव्य आले. यावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. रोहित पवारांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना कुटुंबाबाहेरचं संबोधलं होतं. यावरून शरद पवारांवर अनेक टीका झाली. घरची लक्ष्मी बाहेरची कशी? असा प्रश्न विचारला गेला. तर, शरद पवारांच्या या वक्तव्याविषयी खुद्द सुनेत्रा पवारांंना विचारलं असता त्या भावूक झाल्या. याबाबत रोहित पवार म्हणाले, दादांना विषयच समजला नाही. पवार कुटुंबीयाने नेहमी पुरोगामी विचार मनामध्ये ठेवला आहे. शरद पवार गेली साठ वर्षे प्रतिगामी विचारांविरोधात लढत आहेत. अजित दादा स्वतः तीस वर्षे भाजपाच्या विचारा विरोधात लढत होते.

हेही वाचा >> “निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”

“आता राजकीय दृष्टीकोनातून कुटुंब पाहिलं तर जो विचार आम्ही सर्वांनी जपला त्या विचाराविरोधात अजित दादा गेले. तसं राजकीय दृष्टीकोनातून ते बाहेरचे झाले आहेत. शरद पवारांबरोबर राहिलेले खरे विचारांचे वारसदार आहेत. आम्ही कुठे तरी विचारामधला हा फरक साहेबांनी सांगितला. परंतु, अजित पवारांनी हे प्रकरण वेगळ्या पातळीवर नेलं”, असं रोहित पवार म्हणाले.

अजित दादांचा तोल सुटत जाईल

ते पुढे म्हणाले, द्रौपदीचं उदाहरण द्यायचं काय कारण होतं? महिलांचा अवमान झाला. दादा आता जेवढे भाषण करतील त्यांचा भाषणावरचा तोल सुटत जाईल. मुंबई – दिल्लीवरून त्यांना भाषणं येतात, ते भाषण दादा वाचतात. वाचण्याच्या नादात दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपा करते”, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.