अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग नगर पालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. त्यामुळे नाईक कुटूंबाभोवती पुन्हा एकदा अलिबागचे राजकारण केंद्रीत होणार आहे.
अक्षया नाईक ही माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची धाकटी कन्या आहे. प्रशांत नाईक यांनी तीन वेळा अलिबागचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. त्यांच्या पत्नी कै. नमिता नाईक यांनी देखील अलिबागचे एकवेळा नगराध्यक्षपद संभाळले होते. तर नाईक यांच्या मातोश्री सुनिता नाईक या देखिल अलिबागमधून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. तर त्यांचे आजोबा रावसाहेब नाथोबा नाईक आणि अनंतराव नाथोबा नाईक यांनी देखील अलिबागचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यामुळे अक्षया नाईक जर निवडून आल्या तर त्या नाईक कुटूंबातील सहाव्या नगराध्यक्ष असणार आहेत.
अलिबाग मधून नगराध्यक्षपदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा नाईक कुटूंबावर विश्वास दर्शवत अक्षया नाईक यांच्यावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जबाबदारी सोपवली.
दरम्यान या निवडणूकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा निर्णय शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांनी जाहीर केला. त्यानुसार काँग्रेसच्या समीर ठाकूर आणि अभय म्हामुणकर यांनाही उमेदवारी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सध्यातरी कुठलिही जागा सोडण्यात आलेली नाही.
शेतकरी भवन येथे झालेल्या बैठकीला अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, काँग्रेसचे नेते राजेंद्र ठाकूर, योगेश मगर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नाईक कुटूबातील नगराध्यक्ष आणि कार्यकाळ
रावसाहेब नाथोबा नाईक १९४०- ४२
अनंतराव नाथोबा नाईक १९४३-४७
सुनिता नाईक २००१ ते २००६
प्रशांत नाईक २००६ ते २००८
कै. नमिता नाईक २०११ ते २०१४
प्रशांत नाईक २०१४ ते २०१६
प्रशांत नाईक २०१६ ते २०२२
