अलिबाग: मुंबई पुणे दृतगती मार्गावर ११ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला आहे. खालापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे.

मुंबई पुणे दृतगती मार्गावरून सावरोली पेण कनेक्टर मार्गे मोठा गुटखा साठा नेण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलीसांना गुप्त बातमीदारा व्दारेमिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि खालापूर पोलीसांनी महामार्गावर पेट्रोलिंग सुरू केले होते. संशयास्पक वाहनांची तपासणी सुरू केली होती. सावरोली चारफाटा येथे तपासणी सुरु असतांना मारुती सुझकी कंपनीचा छोटा टेम्पो येतांना दिसला पोलिसांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी गाडी थांबविण्यास सांगताच गाडीचा चालक गाडी बाजूला लावून अंधाराचा फायदा घेत झाडी झुडपात पळून गेला.

त्यानंतर पोलीसांनी पंचाच्या समक्ष टेम्पोची झडती घेतली असता त्यात विमल पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा एकूण ११ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो ही ताब्यात घेतला. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न नागरी सुरक्षा मानके अधिनियम मधील विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील, सहाय्यक फौजदार मोहन भालेराव, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार बाळकृष्ण जाधव, पोलीस शिपाई आशिष पाटील यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली. राज्यात गुटखा आणि मसाल्यांवर बंदी घातली असली तरी छुप्या पद्धतीने गुटखा आहे सुगंधी पण मसाल्यांची विक्री सुरूच असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.