यवतमाळ : भाजपबरोबर राहायचे नसते तर २०१९ मध्ये युतीत निवडणूक लढवली नसती. त्यावेळी भाजप नेते अमित शहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शहांनी शब्द फिरवला आणि आज त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांवर आयात नेत्यांच्या कार्यक्रमात सतरंज्या उलचण्याची वेळ आली, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी रविवारी विदर्भातून पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली. आपण युतीतून बाहेर पडलो नाही तर भाजपनेच आपल्याला युतीतून हुसकवून लावले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपण यापूर्वीच आई-वडिलांची शपथ घेऊन अमित शहा आणि आपल्यात बंद दाराआड काय घडले ते जाहीरपणे सांगितले आहे. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते. ते वचन शहा यांनी पाळले असते तर आज कदाचित भाजप किंवा शिवसेनेचाच मुख्यमंत्री असता.
‘भाजप बाजारबुणग्यांचा पक्ष’
भाजप हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. इतरांचे पक्ष चोरून महाराष्ट्राला लाचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मी महाराष्ट्राला लाचार होऊ देणार नाही. तसेच एक देश एक पक्ष हा भाजपचा डाव साध्य होऊ देणार नाही, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिग्रस येथे केला. उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी दुपारी पोहरादेवी (जि. वाशीम) येथे जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथे सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत – मुनगंटीवार
अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलेले नव्हते. नरेंद्र मोदी यांनी सभेत वारंवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आता खोटे बोलत असून त्यांच्या विदर्भ दौऱ्याचा काही उपयोग होणार नाही, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते नागपुरात बोलत होते. अमित शहा यांनीही अनेकदा सांगितले आहे की, आम्ही कुठलाही शब्द दिला नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
‘आता पक्ष पळवले जातात’
पूर्वीही फोडाफोडीचे राजकारण व्हायचे, मात्र हल्ली भाजपने खालची पातळी गाठली. आता पक्ष फोडण्याऐवजी तो पळवला जातो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या चौकटीत राहूनच निर्णय देणे अपेक्षित आहे. ते लोकशाही मानत असतील तर योग्य निर्णय देतील, असे म्हणाले.
तुमचे प्रेम, आशीर्वाद पाठीशी राहू द्या!
वाशीम : सध्या माझ्याकडे पक्ष नाही, काही नाही. मात्र तरीही तुम्ही मोठय़ा संख्येने येथे उपस्थित राहून तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. हे प्रेम त्यांच्यावर भारी ठरेल, असे उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे म्हटले.
सावंत यांची टीका
अमरावती : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला ‘नौटंकी’ संबोधल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी ‘हे बावनकुळे नाही, तर बावनखुळे आहेत’, अशा शब्दांत टीका केली.
भाजप, ठाकरे गटात खणाखणी
मुंबई : भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. भाजप आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये खणाखणी सुरू असून खासदार अरिवद सावंत यांनी बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनखुळे’ असा केल्याने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना ‘कपडे फाडू’ असा इशारा दिला आहे. ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात भाजपसह सत्ताधारी पक्षांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात, तुम्ही कधीकाळी त्यांच्याच जिवावर मुख्यमंत्री झाला होता. तुम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी केली होती, याचा विसर पडला का? तुमच्या नाकर्तेपणामुळे नेते शिवसेना सोडून बाहेर पडले, हे विसरू नका.