अलिबाग- शाहरुख खान, रणवीर सिंग, दिपीका पादुकोण, अनुष्का शर्मा पाठोपाठ जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील अलिबागकर झाले आहेत. त्यांनी मुनवली येथे तीन साडे सहा कोटीना विकसित भुखंड खरेदी केले आहेत.
पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे अलिबाग गेल्या काही वर्षात प्रमुख गुंतवणुक केंद्र झाले आहे. देशातील बडे उद्योजक, कलावंत आणि क्रिकेटपटू यांनाही अलिबागमध्ये गुंतवणूकीचा मोह आवरता आलेला नाही. शाहरुख खान, अक्षय खन्ना, रणवीर सिंग, दिपीका पादुकोण, अनुष्का शर्मा, राम कपूर क्रिती सॅनन पाठोपाठ आता बीग बी अमिताभ बच्चन यांनाही अलिबाग मध्ये विकसित भूखंड खरेदी केले आहेत. अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे त्यांनी ८ हजार ८८० स्केअर फुटाचे तीन विकसित भुखंड खरेदी केले आहेत. ज्याचे बाजारमुल्य ६ कोटी ५९ कोटी रुपये आहे. नुकतीच या खरेदी व्यवहाराची अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली असून, ज्यासाठी अमिताभ बच्चन यांनी ३९ लाख ५८ हजार रुपयांचा मुंद्रांक शुल्क तर ९० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. त्यामुळे बीग बी अमिताभ बच्चन आता अलिबागकर झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या भुखंडामध्ये ३ हजार ७६० चौरस फुट, २ हजार ५८० चौरस फुट आणि २ हजार ५४० चौरस फुट अशा तीन भुखंडांचा समावेष आहे. ज्याचे बाजार मुल्य अनुक्रमे २ कोटी ७९ लाख, १ कोटी ९२ लाख आणि १ कोटी ८८ लाख असे आहे.
बारमाही सागरी रो रो वाहतुक सेवा, अटल सेतू पाठोपाठ आता रेवस करंजा पुलाचे सुरू झालेले काम यामुळे मुंबई ते अलिबग दरम्यानचे अंतर तीन तासांवरून एक तासावर येणार आहे. पायाभूत सुविधांच्या नव्या प्रकल्पामुळे नवीमुंबई विमानतळावर तासाभरात पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे अलिबागमध्ये गुंतवणुकीचा कल अचानकपणे वाढला आहे. त्यामुळे अलिबागमधील जमिनीचे भाव अचानक वाढला आहे. जागा जमिनींचे व्यवहार वाढीस लागल्याने गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातून साडे तीन हजार कोटींचा मुद्रांक शुल्क जमा झाला होता.
आलिशान बंगले प्रकल्पांची मालिका
दुबईतील बुर्ज खलिफा इमारत बांधणाऱ्या एम्मार कंपनीने अलिबाग मध्ये कासा वेनेरो ८० बंगल्यांचा प्रकल्प सुरु केला आहे. लोढा समुहाने हाऊस ऑफ अभिनंदन लोढा, भास्करनवॉटर फ्रँन्ट सोळा मजली इमारत, हिरानंदानी समुहाने नागाव येथे टाऊनशीप प्रकल्पाची घोषणा केली आहे. आणि महिंद्रा मेरिडियन ओबेरॉय रिएलिटी ने ८१ एकर जागा अलिबाग तालुक्यातील टेकाळी परिसरात खरेदी केली आहे. ज्यात १५० हून अधिक आलिशान बंगल्यांच्या उभारणी केली जाणार आहे.