शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संभाजी भिडे यांचा थेट उल्लेख न करता त्यांची तुलना मनुशी केली आहे. मनुचा काळ संपला आणि मनुही संपला असं वाटत होतं. मात्र भिडूच्या रुपात मनु आजही जिवंत आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यांनी ट्वीट करून ही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “मनोहर कुलकर्णीचा वेळीच बंदोबस्त केला असता तर…”, प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, “मी मनुस्मृती वाचली आहे. मनुस्मृतीमध्ये शूद्र आणि अंत्यज यांच्याविषयी किती विष पेरलंय, याची कल्पना ती वाचल्यानंतर विवेक जागृत असलेल्या वाचकांनाच येते. मनुचा काळ संपला आणि मनुही संपला, असं वाटत होतं. मात्र, या भिडूच्या रुपात मनु आजही जिवंत आहे. #बहुजनांनोसावधान”

हेही वाचा- “…महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on sambhaji bhide statement about mahatma gandhi manusmruti manu rmm