संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं. भिडेंच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी भिडेंचा तीव्र निषेध केला आहे. यावर आता भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला. तसेच संभाजी भिडेंच्या वक्तव्यासंदर्भात राज्य सरकार उचित कारवाई करेल, असंही फडणवीसांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हेही वाचा- पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा; म्हणाले, “एवढीच अपेक्षा आहे की…” संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरुजींसह इतर कुणीही करू नये. कारण अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात निश्चितपणे संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधींविरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाही. या संदर्भात राज्य सरकारकडून उचित कारवाई केली जाईल." हेही वाचा- “संभाजी भिडेंचा भाजपाशी संबंध…”, शिंदे गटाच्या नेत्याचं थेट विधान "महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडेंचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतायत. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.