चिपळूण : “गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खासदार-आमदार लोकशाहीसाठी घातक आहेत. निर्णय लांबवून त्यांना पाच वर्षे सत्तेचा उपभोग घेऊ देणे ही लोकशाहीची थट्टा आहे,” असा घणाघात अॅड. असीम सरोदे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रातील १८३ न्यायालयांत ४४५, तर देशभरात तब्बल ८० हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांना २०१६ मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी अॅड. असिम सरोदे हे चिपळूणात आले होते. सरोदे हे सावंत यांचे वकील आहेत. सावंत यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी ते चिपळूणला आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,“शिक्षा झालेल्यांना फक्त सहा वर्षे बंदी हा कायद्याचा विनोद आहे. कायमस्वरूपी बंदीच हवी,” अशी ठाम मागणी करताना त्यांनी निवडणूक आयोगावरही शंका व्यक्त केली. “राहुल गांधींनी दाखवलेली कागदपत्रे खरी नसतील, तर आयोगाने प्रतिज्ञापत्र देऊन ती खोटी ठरवावी आणि राहुल गांधींवर गुन्हा दाखल करावा,” असा सरळ सवाल त्यांनी केला.
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात शिंदे गटावर हल्लाबोल करत सरोदे म्हणाले, “शिंदेंसोबत गेलेले सर्व अपात्र आहेत. हा ‘अलीबाबा आणि चाळीस चोरांचा’ प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांची बाजू संविधानिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाण गोठवावा किंवा शिंदेंकडून काढून घ्यावा. असा निर्णय आल्यास महाराष्ट्राचे राजकीय गणित बदलेल. “भारतामध्ये न्याय आहे, पण तो चांगल्या न्यायाधीशांच्या शोधात आहे. सर्वोच्च न्यायालयातील वातावरण बदलत आहे. सत्ता आणि ताकदीचा गैरवापर करणाऱ्यांचा पर्दाफाश व्हायलाच हवा,” असेही सरोदे म्हणाले.