बीड : गेली चार दिवस विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली. रात्री ११ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत राहिला. परिणामी नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. पंधरा दिवसात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके वाया गेली. जमिनी खरडून निघाल्याने त्यातच गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना फटका बसल्याचे दिसून आले.

बीड मधील सहा तालुक्यांमध्ये ५० मिलिमीटर पेक्षा अधिकच्या पावसाची नोंद गेल्या २४ तासात करण्यात आली.यामध्ये पाटोदा तालुक्यात सर्वाधिक ७० मिमी त्यांच्या खालोखाल धारूर ६३.८ मिमी तर परळी तालुक्यात ६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या एकूण १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून पाटोदा तालुक्यातील थेरला महामंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने या ठिकाणी ११४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.तर धारूर, तेलगाव,घाटनांदूर मंडळात ८४ मिमी इतका पाऊस पडला आहे.

शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरस्वती नदीच्या पुलाचे काम रखडल्याने या या ठिकाणी वाहनधारकांची धोकादायक वाहतूक सुरू होती.परळी तालुक्यातील अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील लाडझरी येथे पावसाचे पाणी जिल्हा परिषद शाळेत चार फूट साचल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले. माजलगाव तालुक्यातील बडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतही पाणी साचले. बीड शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्याने शहरालाच नदीचे स्वरूप आल्यासारखी स्थिती होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातही पाणी घुसले.

परळी तालुक्यातील भिलेगाव पुलावरून पाणी जात असल्याने या गावचा संपर्क तुटला होता.कन्हेरवाडी ते देव्हाळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने परळी देव्हाडा गावाचा संपर्क तुटला आहे.केज मधील एक तर माजलगाव तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती प्रशासनाने दिली. माजलगाव तालुक्यातील बडेवाडी येथे शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचा काही काळ संपर्क तुटला होता मात्र त्यांना देखील प्रशासनाने मदत पोहोचवली. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात विसर्ग केला जात असल्याने सांडस चिंचोली गावाला पाण्याने वेडले असून या गावचा देखील संपर्क तुटला आहे.

माजलगाव,मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडत सिंदफणा नदी पात्रात ११३९२४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर केजच्या धनेगाव येथील मांजरा धरणातून ३५८८९ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात केला जात असल्याने प्रशासनाकडून सिंदफना आणि मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक बघून हा विसर्ग कमी अथवा वाढवला जाणार आहे.