शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत प्रसारित केली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय गोष्टींवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत बंडखोर आमदारांच्या भेटीबद्दलच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “त्यांना (बंडखोर आमदार) मला भेटण्याची हिंमत होत नाही, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कशी प्रतिक्रिया देईन ते त्यांना माहिती आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता बंडखोर आमदारांचा गट म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी काही वेळापूर्वी विधान भवनाबाहेर टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. आमदार भरत गोगावले म्हणाले, मुळात त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर (बंगला) जायला आम्हाला काहीच हरकत नाही.

आमदार भरत गोगावले म्हणाले, बाळासाहेबांच्या ‘मातोश्री’वर (बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला) जायला आम्हाला काहीच अडचण नाही. पूर्वीची जी ‘मातोश्री’ आहे, तिथे जायला आमची हरकत नाही. परंतु साहेबांनी (उद्धव ठाकरे) आता जी आठ माळ्यांची नवी मातोश्री (उद्धव ठाकरे यांनी बांधलेला नवीन बंगला) बांधली आहे, तिकडे जायला आम्हाला अडचण आहे. कारण आम्ही आठ माळे चढू शकत नाही. आम्ही पूर्वी तीन माळे चढत होतो, त्याला काही हरकत नव्हती. पण आता आठ माळे चढता येत नाहीत. नव्या ‘मातोश्री’ला लिफ्ट आहे, परंतु लिफ्ट बंद पडली तर आमची अडचण होईल.

हे ही वाचा >> “अजित पवार आज ना उद्या नक्कीच…”, प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले होते की, “त्यांनी (बंडखोर आमदारांनी) स्वतःच्या नावावर, राजकारणावर आगामी निवडणुकीत लोकांची मतं मागावी. माझ्या वडिलांचं नाव वापरू नये”. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरही आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले म्हणाले, आम्ही त्यांच्या वडिलांचं नाव उंचीवर नेतोय. त्यांचं नाव खाली पाडत नाही. त्यांच्या नावाला (बाळासाहेब ठाकरे) कुठे बाधा आली तर उद्धव ठाकरे यांनी बोलावं. तोवर काही बोलू नये.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale says we cannot climb eight floors of new matoshree on meeting with uddhav thackeray asc