अयोध्येमधील बाबरी मशीद कोणी पाडली यावरुन सध्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक संघर्ष सुरु आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असं म्हटलं आहे. यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय?

मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलं. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.

उद्धव ठाकरेंनी पत्नीला टोला लगावल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले “मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी…”

बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपाचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.

आदित्य ठाकरेंनी लगावला होता टोला –

सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दिनी झालेल्या दोन्ही सभांचा उल्लेख करत आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्ही मूळ मुद्द्यांवर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची कामं करत आहे. लोकांची चूल कशी पेटती राहील यासाठी आम्ही काम करतोय, असं आदित्य म्हणाले. मात्र राज्यातील विरोधी पक्षातील नेते लोकांची घरं पेटवण्याची कामं करत आहेत, असा टोला आदित्य यांनी लगावला होता.

फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असताना आदित्य ठाकरेंनी, “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली.

फडणवीसांनी दिलं उत्तर –

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस १८५७ च्या उठावातही सहभागी होते अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करु शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे”.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचं बंड होत असं ते मानतात”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on shivsena aditya thackeray hindutva babari masjid demolition sgy