BJP vs Supriya Sule Non Vegetarian Diet : “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुमची काय अडचण?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. मांसाहारावरून टीकाटीप्पणी करणाऱ्यांवर सुळे यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपा नेते जोरदार टीका करू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने खासदार सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत ‘सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा पांडुरंगाचा व वारकऱ्यांचा अपमान केला’ असल्याचं म्हटलं आहे.
तर, महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जेवणेंही नाम घेऊनी करावें, परि करु नये जीव हिंसा” असे संत तुकाराम महाराज सांगतात. भगवंताचे नाव घेऊन जेवण करावे, हिंसा करून, कुणाला मारून खाऊ नये, असा संस्कार देणाऱ्या तुकोबारायांच्या मराठमोळ्या महाराष्ट्रात सोयीचा विठ्ठल आणि सोयीच्या विठ्ठलभक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदयाची थट्टा चालवली आहे.”
माळकरी कधीच मांसाहाराकडे वळत नाहीत : उपाध्ये
उपाध्ये म्हणाले, “विठ्ठलभक्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबातील माळकरी कधीच मांसाहाराकडे वळत नाहीत. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतानाच, मांसाहार वर्ज्य करण्याचे व्रत सुरू होते आणि रोज हरिपाठाचा परिपाठ सुरू होतो. हिंसा करणार नाही, दारू पिणार नाही, दिंडी सहभाग सात्विक आहार व उपवास असे पंच नियम पाळून माळ धारण करतात, आणि पिढ्यानपिढ्या ही माळ जपली जाते.”
भाजपाची सुप्रिया सुळेंवर टीका
दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा पांडुरंगाचा व वारकऱ्यांचा अपमान केला आहे. शरद पवार गटाचे नेते स्वतःला काय समजतात? उठ-सुठ हिंदूंच्या देवीदेवतांचा आणि परंपरांचा अपमान करतात, स्वतःला देवांचा बाप म्हणवून घेतात, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करतात, प्रभू श्रीरामाचा अपमान करतात, हिंदूंना आराध्य असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अपमान करतात. हिंदूनी निवडणुकीत यांना जागा दाखवली की मग मतदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.”