भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ या शिवसेनेच्या घोषणेनुसारमहाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आपला मुलगा उपमुख्यमंत्री असंच चित्र दिसलं आहे. आताही मुंबईत कोणत्याही बॅनरवर फक्त चारच फोटो दिसत आहेत. पाचवा फोटोच दिसत नाही, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी काही लोकांनाच जवळ केल्याने त्यांना ४० आमदार आणि खासदार सोडून गेले आहेत. ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ एवढाच त्यांचा हेतू आहे, म्हणूनच उद्धव ठाकरेंसोबत आता कोणीही कार्यकर्ता उभं राहायला तयार नाही. एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही. ही वेळ एकेदिवशी नक्कीच येणार आहे. कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ आली तेव्हा मुलगा उभा झाला. कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा स्वतःच मुख्यमंत्री झाले, असंही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा- “शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री करेन, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना मनोहर जोशी, नारायण राणे यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं. पण उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष येताच ते स्वतः मुख्यमंत्री झाले. यामुळेच शिवसेनची अशी अवस्था झाली आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. नाना पटोले यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे बोनस कपात केले, धानाचे बोनस देऊ केले होते, ते दिले नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या विकासाची एक टक्कासुद्धा बरोबरी नाना पटोले करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती आहे. संपूर्ण अभ्यास केलेल्या कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule on shivsena chief uddhav thackeray in wardha rno news rmm
First published on: 25-09-2022 at 20:05 IST