bjp mla atul bhatkhalkar criticize-ncp-leader-sharad-pawar-over-ncp-convention-song-azeem-o-shaan-shehenshah | Loksatta

‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलन शरद पवारांच्या एन्ट्रीला अज़ीम-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं होतं. यावरुन भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला
शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या 'त्या" गाण्यावरुन अतुल भातखळकांचा टोला

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय संमेलन पार पडले. या संमेलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एंट्रीला कार्यकर्त्यांनी ‘जोधा अकबर’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘अज़ीम-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं होतं. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शरद पवार जाणते राजे नसून मुघल शहेनशाह आहेत. साडे-तीन जिल्ह्यांचे अज़ीम-ओ-शान शहंशाह आहेत’, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

हेही वाचा- “दिल्लीतील शहंशाह हीच खरी…”, भाजपाचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “राज्यात महाराजांच्या नावाने…”

भातखळकरांनी याबाबत ट्वीटही केलं आहे. ‘दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे…’ असा टोला भातखळकरांनी लगावला.

भाजपा महाराष्ट्रकडून ट्वीट

‘मरहबा जनाब शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह, फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली ‘शहंशाह’ हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?’ असं ट्वीट भाजपा महाराष्ट्रने केलं आहे.

हेही वाचा- “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, नाराजीनाट्यावरुन अजित पवारांचा सवाल

संमेलनात अजित पवारांच्या नाराजीची चर्चा

संमेलनात शरद पवारांच्या त्यांच्या भाषणापूर्वी अजित पवार यांचे भाषण होणार होते. त्यानुसार अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, त्या वेळी ते तेथे उपस्थित नव्हते. यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. नाराजीनाट्यामुळेच अजित पवार जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान सभागृहाबाहेर उठून गेल्याचा तर्क लावण्यात येत होता. मात्र, या तर्क-वितर्कांवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील अधिवेशन नव्हते. हे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यामुळे मी भाषण केले नाही. जे काही बोलायचे ते मी महाराष्ट्रात बोलेन,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2022 at 13:42 IST
Next Story
“मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, नाराजीनाट्यावरुन अजित पवारांचा सवाल