माझं वक्तव्य नीट ऐकलं असतं तर त्याचा अर्थ कळला असता. पण हा वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही. कारण अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. त्यामुळे, मला अशा वक्तव्यांना फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही”, असा टोला लगावत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज (१४ सप्टेंबर) राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, या प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली. याबाबत दरेकर यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण दरेकर यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील दरेकर यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात. कुणीही अतिरेकी भाषा करु नये. हे योग्य नाही. ती केवळ मराठीतील एक म्हण आहे” असं सांगतानाच “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”, असं स्पष्टीकरण देखील दरेकर यांनी दिलं आहे. त्याचप्रमाणे, वक्तव्य नीट ऐकण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

मी असं म्हणालो होतो की…! दरेकरांचं स्पष्टीकरण

“भाजप हा सर्वसामान्यांचा व तळा गाळ्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा, उद्योगपतींचा पक्ष असून अशाप्रकारे ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारे काही प्रवृत्तींचा पक्ष आहे असं मी म्हणालो होतो. राष्ट्रवादी हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे महिलांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य मी केलं नाही व तसं बोलायचं कारणही नव्हतं, तसा विषयही नव्हता. विरोधकांना माझं विधान नीट ऐकण्याची आवश्यकता आहे”, असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

रुपाली चाकणकरांचा इशारा काय?

रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून दिसणारं वैचारिक दारिद्र्य संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp praveen darekar gives explaination his statement while criticizing ncp gst