सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, आगामी कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने लढणार आहे. कमळ चिन्हाचा उमेदवार आपला असणार असून, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा यापुढेही भाजपमय राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील युवा नेते विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे, अजित गोगटे, प्रमोद जठार, प्रभाकर सावंत, विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, भाजपच्या ताकदीमुळेच स्वबळासाठी कार्यकर्ते इच्छुक आहेत. भाजप निवडणुकीसाठीच नव्हे, तर वर्षभर काम करणारा पक्ष आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवणचा विकास करण्यासाठी आपल्याला सत्ता हवी आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, सभापती एकाच विचाराचे असल्याने विकास कोणीही रोखू शकत नाही. सिंधुदुर्गात उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) यांच्याकडे उमेदवार शिल्लक नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी युती झाल्यास कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे ‘मैत्रीपूर्ण’ निवडणूक लढवून नंतर आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवा आणि सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला देण्यासाठी हे कार्यालय सुरू झाले आहे. “३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे कमळ दिसेल,” असा विश्वास व्यक्त करत, त्यांनी चारही नगरपरिषदेत भाजपला यश मिळेल, असा दावा केला. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत यावेळी उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, कुडाळचे रुपेश पावसकर, मालवणचे शुभम मठकर यांच्यासह रोणापाल, माडखोल येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
