केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून शेतकरी आंदोलन करत आहे. अशात केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री जपान दौऱ्यावर आहेत. त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री पीयूष गोयल यांच्याशी निर्यातशुल्काबाबत चर्चा केली.

ट्वीट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.”

हेही वाचा : अजित पवारांचा एक प्रश्न अन् शिंदे गटात अस्वस्थता; मुख्यमंत्र्यांना थेट म्हणाले, “तुमच्या ठाण्यात…”

“केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹२४१० प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : “दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी..” , मुंबई गोवा महामार्गावरुन रविंद्र चव्हाण यांचा राज ठाकरेंना टोला

कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत

“शेतकरी आंदोलन करू लागले, त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांचा प्रतिनिधी म्हणून ४० टक्के निर्यात शुल्काच्याबाबत पुर्नविचार करावा. कांद्याचे भाव बाजारात पडले, तर नाफेड आणि एनसीएटीच्या माध्यमातून त्याची खरेदी करावी, अशी विनंती वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना केली. यानंतर २४१० रुपयांची २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे,” अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central govt buy 2 lakh metric tonnes onion rate 2410 in nashik ahmednagar say devendra fadnavis ssa