मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली आहे. या भेटीआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खोचक सल्ला दिला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजुला ठेवा, असा खोचक सल्ला राऊतांनी दिला होता.
या विधानावरून भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजीराचाच आहे. त्यामुळे किमान यांच्या (शिंदे गटाच्या) खंजिराला एक पार्श्वभूमी आहे. हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे आणि ते असह्य झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. पण त्यांचा हा आपसातला विषय आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यावरून संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही.”