नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. फडणवीस हे दिल्लीला नेमके कशासाठी गेले? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण सांगितले आहे. ते आज (२५ डिसेंबर) निफाड येथे माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“महाराष्ट्रातील अनेक योजनांचा निधी थकलेला असून तो आणण्यासाठी व विविध योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत,” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आगामी निवडणुकीत भाजपा पक्ष सर्वोच्चस्थानी असेल, असा दावा बावनकुळे यांनी केला. “जिल्हा परिषद, पंचायत समिती असो व स्थानिक स्वराज्य संस्था असो यामध्ये भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील,” असे बावनकुळे म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. याचेदेखील बावनकुळे यांनी समर्थन केले. “महाविकास आघाडीच्या काळात काही चूक नसतानाही बारा आमदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र जयंत पाटील हे भर सभागृहात बोलले असून त्यांचे बोलणे अशोभनीय आहे. जयंत पाटील यांनी खुलेआम शिवीगाळ केली आहे. त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई योग्यच आहे,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.