Chandrashekhar Bawankule Property Registration : घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार : महसूल मंत्री

महसूल मंत्री म्हणाले, “तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करूशकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे.” सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule one state one registration online asc