Chandrashekhar Bawankule Statement on Mobile phones Under Surveillance : “सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असंही ते म्हणाले. “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. तुमचं एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.”

सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकलेत : बावनकुळे

बावनकुळे म्हणाले, “तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतंय त्यावर लक्ष आहे.

बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा भाजपाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेली त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच सरकारच्या कामाचा बट्ट्याबोळ होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयार, माजी राज्यमंत्री व आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, भंडारा जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार हेमकृष्ण कापगते भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हिपुंजे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, भंडारा जिल्हा भाजप युवामोर्चा अध्यक्ष सचिन बोपचे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा माहेश्वरी नेवारे, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वासनिक, अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक उईके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डिम्मू शेख, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन उपस्थित होते.