Vijay Ghadge Patil On NCP Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळात मोबाइलवर रमीचा डाव (पत्ते) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. अशातच, लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत पत्त्याचा डावही दिला. “मंत्री सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी पत्ते खेळत असतील तर त्यांना घरी बसवा आणि घरीच पत्ते खेळायला सांगा, त्यासाठी हे पत्ते त्यांना द्या”, असं म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

दरम्यान, निवेदन देऊन बाहेर पडत असलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला झाला. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी ‘छावा’च्या प्रतिनिधींवर हल्ला केला. निवेदन द्यायला आलेल्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनाही मारहाण केली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका होऊ लागली आहे. विजयकुमार घाडगे यांनी माध्यमांसमोर येत लातूरमधील शासकीय विश्रागृहात नेमकं काय झालं ते सांगितलं.

विजयकुमार घाडगे म्हणाले, “कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी पत्ते खेळत होते. त्यामुळे कृषीमंत्र्यांविरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना भेटायला गेलो होतो. अशा नेत्याला कृषीमंत्रीपदी ठेवू नका अशी आम्ही मागणी केली. सभागृहात पत्ते खेळणारे कृषीमंत्री शेतकऱ्यांचं काय भलं करणार? शेतकऱ्यांच्या बाबतीत काय चांगले निर्णय घेणार? असा प्रश्न आम्ही उपस्थित केला.”

“आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तेचा माज दिसला”

“कोकाटे यांना सभागृहात शेतकऱ्यांसाठी बोलण्याऐवजी पत्ते खेळण्यात रस असेल तर त्यांना पत्ते द्या आणि घरी बसवा. घरी बसून त्यांना पत्ते खेळू द्या, असं म्हणत आम्ही तटकरे यांना आमचं निवेदन दिलं. तसेच कोकाटे यांना देण्यासाठी पत्ते देखील दिले. निवेदन देऊन आम्ही बाहेर दुसऱ्या हॉलमध्ये गेलो. अचानक तिथे राष्ट्रवादीचे गुंड आले. त्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो तो आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसला.”

छावा संघटना सूरज चव्हाणविरोधात आक्रमक

‘छावा’चे सदस्य म्हणाले, “या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. सूरज चव्हाणला त्याची जागी जागा दाखवू. उद्यापासून आमचा कार्यक्रम चालू… सकल मराठा समाज त्याचा बंदोबस्त करेल.” दुसरा एक कार्यकर्ता म्हणाला, “सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय, त्यामुळे जनतेला अशी वागणूक मिळत आहे. कृषीमंत्री सभागृहात रम्मी खेळत आहेत. जनता त्याबद्दल जाब विचारायला गेल्यावर त्या पक्षाचे गुंड जनतेला मारहाण करतात, लोकचळवळ संपवण्याचा प्रयत्न करतात.”