मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यांत तीन प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारची ‘सौदी आराम्को’शी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आराम्को कंपनीने आंध्र प्रदेश व गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केली आहे. केंद्रानेही अन्य राज्यांमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत भूमिका घेतल्याने महाराष्ट्राने हा प्रकल्प गमावल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत संबंधितांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. देशात सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा सौदी आराम्को कंपनीचा मानस आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर बारसूमधील पर्यायी जागेचा विचार झाला.

दीड वर्षापूर्वी तांत्रिक चाचण्यांचे काम झाले असून अहवालावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळ आणि आचारसंहितेमुळे महाराष्ट्रात शासकीय पातळीवर फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे कंपनीने सागरी किनारपट्टी असलेल्या गुजरात व आंध्र प्रदेश राज्य सरकारशी चर्चा सुरू केली होती. किमान २० दशलक्ष टन क्षमता असलेला प्रकल्प उभारण्यासंदर्भात राज्य सरकारची कंपनीशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचा विकास आणि अर्थकारणाला मोठा हातभार लावणारा हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, असे आपल्या सरकारचे प्रयत्न असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

बारसू येथील मृदापरीक्षण तपासणी अहवाल सकारात्मक असून राज्यात प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही अडचणी नाहीत. प्रकल्पासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आणि केंद्रासह कंपनीच्या उच्चपदस्थांशी चर्चा करण्याचे काम सध्या सुरू आहे. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis assured green oil refining project will be built at barsu in ratnagiri zws