Devendra Fadnavis On Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अनेकदा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. कारण काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या चर्चांनी जोर धरला होता. पण त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे. आज मुंबईत अण्णासाहेब डांगे यांचा भाजपात प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मात्र, यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगलीमधून आणखी काही पक्ष प्रवेश होतील का? असा प्रश्न विचारला.

सांगलीमधून आणखी काही पक्ष प्रवेश होतील का? पत्रकारांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सूचक भाष्य करत उत्तर दिलं आणि एकच हशा रंगल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो प्रवेश सध्या तरी आमच्या मनामध्ये नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर सध्या तरी पडदा पडला आहे.

अण्णासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

जयंत पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?

जयंत पाटील हे नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्याही अनेकदा उठल्या होत्या. यावर जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका मांडली होती. जयंत पाटील म्हणाले होते की, “भाजपात प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मी कुणाला विनंतीही केली नाही. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या एवढ्या वावड्या उठण्याचे कारण काय? मी कुठे जाणार? हे माध्यमांनीच ठरवून टाकले. याचे मला आश्चर्य वाटते.”