महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे. आता ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता त्यातून या राज्याची सुटका करण्याची संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली. मी जेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटतो तेव्हा मला एक सकारात्मक उर्जा मिळते. मुंबईचा कायापालट होण्याची सुरूवात झाली आहे. दोन ते अडीच वर्षात मुंबईचा कायापालट आपल्याला पाहण्यास मिळेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण होतं आहे

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं आणि आज तेच या प्रकल्पाचं लोकार्पण करत आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. काही लोकांची अपेक्षा होती की हे कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये पण तसं झालं नाही आज जे घडतं आहे ते आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा होती, महाराष्ट्राची आणि मुंबईची अपेक्षा होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं आहे. आता मेट्रोचा हा सोहळा आपण करतो आहोत. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जोडलं गेलं. मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो

मुंबईत विविध उपक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या कार्यक्रमासाठी इथे आले त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आमचं सरकार प्रगती करणारं,

आमचं सरकार हे प्रगती करतं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करतो आहोत. विविध प्रकारचे विकासाला चालना देणारे निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांना मदत केली, गोरगरिबांना मदत केली, पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. विविध निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या पोटात मळमळ होते आहे, छातीत धडधड होते आहे. सहा महिन्यात या सरकारने एवढं केलं तर पुढच्या दोन वर्षात काय करतील? या अस्वस्थेतूनच ही टीका होते आहे. असाही टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.