दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केलं होतं. २५ वर्षांत उद्धव ठाकरेंनी काय कामं केली ते जरा दाखवावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकर आजही तुमचे मित्र आहेत का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांचा उल्लेख भोंगा असा केला

“राजकीय मतभेद झाले तर ते मिटवता येतात. त्यावर काहीतरी पर्याय काढता येतो. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं नाही. आता आमची मनं दुखावली आहेत. सध्या दिवसरात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आमच्या मोदींना शिव्या देत असतील तर आम्ही कसे काय त्यांच्यासह जाणार? रोज १०-२० शिव्या मोदींना दिल्या नाहीत तर त्यांना अन्न पचत नाही. काही लोक त्यांनी असे सोडले आहेत जे ९ वाजता भोंगा सुरु करतात, मोदींना शिव्या देणं सुरु करतात आणि संध्याकाळपर्यंत तेच करतात. त्यामुळे आता त्यांच्यासह काहीही झालं तर जाणार नाही. “

उद्धव ठाकरेंशी मैत्री होऊ शकते का?

“उद्धव ठाकरे माझे मित्र होते. ते आत्ता मित्र आहेत की नाहीत हे त्यांना विचारलं पाहिजे. मित्र तो असतो जो फोन उचलून सांगतो की तू मागणी करतो आहेस पण हे शक्य नाही. ज्यावेळी युती म्हणून निवडून आलो. त्यावेळी त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. पाच वर्षे जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी कधीही त्यांना टाळलं नाही. त्यांचा फोन मी कायम घ्यायचो. मात्र २०१९ मध्ये मी निकालानंतर जेव्हा त्यांना फोन केले तेव्हा त्यांनी घेतलेच नाहीत. शिवाय मला त्यांनी फोन केलाच नाही. मला त्यांनी सांगितलंच नाही की आता आपण बरोबर नाही. मैत्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तु्म्ही उद्धव ठाकरेंना विचारा. सगळे मार्ग त्यांनी बंद केले. त्यानंतर औपचारिक बोलणं कधीही झालेलं नाही. समोरासमोर भेट झाली तर कसे आहात विचारतो. तेवढी कर्टसी अजूनही महाराष्ट्रात आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “२५ वर्षांत मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड….”, देवेंद्र फडणवीसांची टीका

२५ वर्षे आम्ही भावंडांसारखे राहिलो

आम्ही २५ वर्षे ज्यांच्याशी सुखं दुःखं वाटली, आम्ही भावंडांप्रमाणे राहिलो. असे लोक जेव्हा आमच्या पाठित विश्वासघाताचा खंजीर खुपसतात आणि वाईट वागणूक देतात तेव्हा मन दुखवतात. बाळासाहेब ठाकरेंचा विचार मानणारी शिवसेना एकनाथ शिंदे एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य कलं आहे.

शिंदेंसह इमोशनल आघाडी –

अजित पवार यांच्यासाठी आघाडी ही एक रणनीती आहे. शिंदेसह यांची आघाडी ही आमची इमोशनल आघाडी आहे. प्रत्येक सरकारची कामाची एक वेगळी पद्धत असते. मी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. मुख्यमंत्री असताना मी जो अजेंडा चालवत होतो तो आताही उपमुख्यमंत्री असताना चालवत आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये माझा तेवढाच सहभाग आहे, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांनी माघार का घेतली

युतीसाठी शरद पवार बोलले अजित पवार यांना तयार केले आहे. पण माहीत नाही शरद पवार यांनी माघार का घेतली? अजित पवार यांना आधी पुढे केले, मग शरद पवार मागे हटले. म्हणून अजित पवार आज आमच्यासोबत आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.