Eknath Shinde Delhi Visit : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे दौरे, भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपमुख्यमंत्री शिंदे भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा शिवसेनेचे (शिंदे) सर्व खासदार देखील उपस्थित होते. यातच अमित शाह यांच्या भेटीनंतर ते पंतप्रधान मोदींची देखील भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे यांनी अमित शाह यांची अचानक भेट का घेतली? या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र, लगेचच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अमित शाह यांची भेट का घेतली? याचं कारणही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. ‘अमित शाह यांची आपण सदिच्छा भेट घेतली असून काही खासदारांचे प्रश्न होते, ते प्रश्न अमित शाह यांच्याकडे मांडले आहेत’, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. मी पक्षाच्या सर्व खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट होती. काही खासदारांचे देखील काही विषय होते. ते विषय त्यांच्याकडे मांडले आहेत. मागच्या आठवड्यात मी दिल्लीत आलो होतो. पण तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर सदिच्छा भेट झाली आणि काही खासदारांचे विषय होते, त्यावर चर्चा झाली”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“तसेच सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद भुषवण्याचा मान अमित शाह यांना मिळाला, त्याबाबत अमित शाह यांचं अभिनंदन केलं. तसेच काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचं अभिनंदन केलं. अमित शाहांनी अतिशय चांगलं काम केलं असून आणखी खूप चांगलं काम करायचं असल्याचं पंतप्रधान मोदी देखील म्हणाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे”, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
“आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या आहेत. आताही आम्ही महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार आहोत. याबाबत अमित शाह देखील सकारात्मक आहेत. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे. मी लपूनछपून काही काम करत नाही. तर मी जे करतो ते सर्वांसमोर करतो”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली.