Deepak Kesarkar : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मी नाराज नाही असं सांगणारे दीपक केसरकर यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसंच मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मी मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर जाईन असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझं मंत्रिपद देव ठरवतो

“अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे.”

रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्री झाले-केसरकर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले आहेत ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा- Maharashtra Politics : महायुतीने छगन भुजबळ यांच्यासह १२ माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं?

नाणारबाबत काय म्हणाले दीपक केसरकर?

नाणार रिफायनरीवरून कोकणातील नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजीमंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांनी ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का हे तपासून पाहावं लागेल असं वक्तव्य केलं. त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील असलेली मतभिन्नता समोर आली आहे.

मी केलेल्या कामांची पुस्तिका काढणार आहे-केसरकर

“मला केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काळजी नाही. कुठल्याही मंत्र्याने कामं केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात असताना केली. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असो वा शिक्षण विभाग असो, या विभागात मी मोठी कामं केली. मी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका काढणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहणार असंच काम मी या आधी केलंय आणि पुढच्या काळातही करेन.” असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar claim many leaders tried prevent me from getting ministerial post what did he say scj