सावंतवाडी: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून, जर्मनीमध्ये ३ ते ४ लाख रोजगाराच्या संधी आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने जर्मनीशी करार केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १० हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर एक लाख तरुणांना जर्मनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जर्मनी-महाराष्ट्र करार: एक आदर्श उपक्रम
केसरकर म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीच्या बेडन युटनबर्ग राज्याचा हा करार एक आदर्श उपक्रम आहे. काही लोक अपुऱ्या माहितीच्या आधारावर यावर आरोप करत आहेत, जे योग्य नाही. मी शिक्षणमंत्री असताना या योजनेला गती दिली होती. सध्या या कामाला उशीर होत असल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या योजनेचा समन्वयक म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर या योजनेला पुन्हा गती मिळेल, असे ते म्हणाले.
या योजनेत फसवणुकीचा कोणताही प्रश्न नसल्याचे सांगत केसरकर म्हणाले की, दिलेली नियुक्तीपत्रे खोटी नाहीत. व्हिसा मिळवण्यासाठी परीक्षा पास होणे आवश्यक आहे. ही योजना सिंधुदुर्ग आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. काही लोकांनी मुलांच्या मनात गैरसमज निर्माण केले आहेत. उद्योजक ओंकार कलावडे यांना सरकारने निधी दिल्याचा गैरसमज पसरवला गेला आहे. कलावडे हे एक उद्योजक असून, त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने या कामात सहभाग घेतला आहे.
शासनाकडून त्यांना एकही रुपया देण्यात आलेला नाही.जर्मन भाषेच्या प्रशिक्षणाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले की, मुलांना ‘ए-वन’ परीक्षा पास करण्यात यश आले आहे, पण ‘ए-टू’ परीक्षा पास होणे आवश्यक आहे. ही परीक्षा पास झाल्याशिवाय व्हिसा मिळू शकत नाही. व्हिसा मिळवण्याचे महत्त्व मुलांना माहीत आहे. आता समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी आल्यावर मी सर्व मुलांना न्याय मिळवून देईन. सिंधुदुर्गातील जवळपास ९० मुले या योजनेत आहेत. त्यापैकी ४ मुलांना व्हिसा मंजूर झाला आहे. नापास होणे हा गुन्हा नसून, पुन्हा परीक्षा देणे आवश्यक आहे.
सिंधुरत्न योजना, अंमली पदार्थ आणि रस्त्यांची दुरुस्ती:
याव्यतिरिक्त, केसरकर यांनी अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले, ‘सिंधुरत्न योजना’ या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’मध्ये हत्तींची योग्य काळजी घेतली जाते असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हत्तींना ‘वनतारा’मध्ये पाठवले जाईल. गोव्याने हत्तींचा सांभाळ करावा, याला माझा विरोध नाही, मात्र स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, हीच आमची भूमिका आहे.
अंमली पदार्थ:
अंमली पदार्थ हे समाजासाठी अत्यंत घातक असून, यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. यावर कठोर कारवाई करण्यासाठी मी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निरीक्षकांशी बोललो आहे.
पाऊस थांबल्यानंतर त्वरित खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला सांगितले जाईल. इतर ठिकाणांच्या तुलनेत आपल्याकडील रस्त्यांची स्थिती चांगली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.