विशाळगड या ठिकाणी जो दर्गा आहे तो दर्गा म्हणजे अतिक्रमण नाही असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे. तर विशाळगडावरची अतिक्रमणं का हटवत नाहीत? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. तसंच १४ जुलैच्या दिवशी त्यांनी चलो विशाळगड अशी घोषणाही दिली होती. ज्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. आता उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय घडलं १४ जुलैच्या दिवशी?

संभाजीराजे आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असताना कार्यकर्ते आणखी मोठ्या संख्येनं जमले. पोलीस गडावर जाऊ देत नसल्यानं गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावाकडे मोर्चेकरी गेले. याठिकाणी घरांवर दगडफेक झाली. घरासमोर लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये एका घराली आग लावण्यात आली होती. तसेच गडाच्या पायथ्याशी काही लहान विक्रेते होते त्यांच्याही साहित्याची नासधूस केली. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. यानंतर आता महाविकास आघाडीने आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच शाहूमहाराज छत्रपती यांनीही झालेला हिंसाचार योग्य नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणावर महाविकास आघाडीने जी भूमिका घेतली आहे त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी मविआपुढे एक प्रश्न उपस्थित केला आहे.

छायाचित्रात १) किल्ले विशाळगड येथे जमावाने घर पेटवून दिले. २) वाहनांची नासधूस करण्यात आली. ३) मोहिमेमध्ये सहभागी झालेले संभाजी राजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

विशाळगडाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने झालं पाहिजे, नियम पाळून झालं पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल. आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल? याला आमची प्राथमिकता आहे. विशाळगडच नाही तर सगळ्या गडांवरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे. “

हे पण वाचा- विशाळगडची घटना जिल्हा प्रशासन, पोलिसांचे अपयश – शाहू छत्रपती यांचा आरोप

महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांचा टोला

“मला आश्चर्य वाटतं की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे? महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे की ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडांवर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे फडणकवणाऱ्यांच्या बाजूने आहेत?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नमो एक्स्प्रेसबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाजपाच्या वतीने नमो एक्स्प्रेस सोडण्यात आली. मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन ही व्यवस्था केली आहे. वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक अभिमान आहे, अध्यात्मिक अभिमान आहे. ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्षे उंच ठेवली त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा पंढरीला पाहण्यास मिळतो. विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेला वारकरी हा कशाही पद्धतीने पंढरपूरमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मुंबईतला जो वारकरी आहे जो कुठे नोकरी करतो, व्यवसाय करतो, छोटं मोठं काम करतो, त्याच्या मनातही पंढरीची आस आहे. त्याला वाटतं मला जाता येईल का? त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तीर्थक्षेत्रांच्या बाबतीतली योजना ही मुख्यमंत्र्यांनी तयार केली. त्यामागची प्रेरणा हीच आहे की मराठी माणूस किंवा भारतीय माणूस असतो त्याला हे वाटत असतं की आपण आपल्या तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे. अशा माता-पित्यांचं मूल होऊन सरकारने व्यवस्था केली आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.