गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू या राणा दाम्पत्यानं दिलेल्या इशाऱ्यावरून मोठा वाद सुरू आहे. आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना मातोश्रीवर जाणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्याच्या मागे भाजपा असल्याचा आरोप केला. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राणा दाम्पत्यानं आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतून भाजपावर निशाणा साधला होता. “हे प्रकरण आम्ही मोठं केलेलं नाही. तर कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणारे बंटी आणि बबली किंवा इतर काही नवहिंदुत्ववादी ओवेसी आले आहेत त्यांना मोठं करण्याचे काम भाजपा करत आहे. पण त्यामध्ये त्यांचेच हात पोळणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांना ममता बॅनर्जी पुरून उरल्या आहेत. केरळमध्ये त्यांना श्वासही घेता येत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पुरुन उरण्यासाठी त्यांना सात जन्म घ्यावे लागतील,” असं संजय राऊत म्हणाले. यासंदर्भात बोलताना आता देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे.

“मी आत्ताच सांगतो, राणा दांपत्याला सुरक्षित जाऊ द्या, नाहीतर…”, नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा!

संजय राऊतांना टोला!

“एक तर संजय राऊतांना विचारतं कोण? त्यांचं महत्व काय? संजय राऊत हेही म्हणू शकतात की अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मी घाबरत नाही. अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना हुंगतो तरी का? संजय राऊत त्यांना माहिती तरी आहेत का? त्यामुळे ही अशी रोजची वक्तव्य करून ही असल्या प्रकारची कागदी लोकं राजकारणात फार काही परिवर्तन करू शकत नाहीत”, असं फडणवीस म्हणाले.

“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

“संजय राऊतांना आम्ही फार काही गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांचा पक्षही गांभीर्यानं घेत नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ते सौजन्याची भाषा करतात. सौजन्य होतं कधी त्यांच्याकडे? ज्या प्रकारे तुम्ही मीडियासमोर बोलताय, तुमची वक्तव्य घरात परिवारासोबत बसून ऐकता येत नाहीत. हे शिवराळ लोक आहेत. हे राजकारणी थोडी आहेत”, असं देखील फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mocks sanjay raut on navneet rana couple hanuman chalisa pmw