scorecardresearch

“मी आत्ताच सांगतो, राणा दांपत्याला सुरक्षित जाऊ द्या, नाहीतर…”, नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा!

नारायण राणे म्हणतात, “मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे. नाहीतर त्याआधी पोलिसांनी राणा दांपत्याला सुरक्षित बाहेर काढावं!”

Narayan rane attack cm uddhav Thackeray after ed action Shridhar Patankar

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेलं हनुमान चालीसा नाट्य अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये. राणा दांपत्यानं आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, आज सकाळपासूनच मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्ते जमले. अखेर दुपारी ३ च्या सुमारास रवी राणा आणि नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलन संपवण्याची घोषणा केली. राणा दांपत्य मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेनेकडून राणा दांपत्यानं माफी मागितल्याशिवाय त्यांना परत अमरावतीला जाऊ देणार नाही, असं जाहीर केलं आहे. त्यासंदर्भात बोलताना आता नारायण राणेंनी थेट शिवसेना आणि मुंबई पोलिसांनाच इशारा दिला आहे.

“महाराष्ट्रात सरकार आहे असं वाटत नाही”

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी राणा दांपत्यानं या सगळ्या प्रकारासाठी माफी मागितल्याशिवाय त्यांना घरातून बाहेर पडू देणार नसल्याचं जाहीर केलं. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “आज मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतली आहे. महाराष्ट्रात सरकार आहे असं काही वाटत नाही. सरकारी पक्षच मुंबईतलं वातावरण बिघडवत आहे असं वातावरण सध्या आहे. शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं किंवा पत्रकार परिषदा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे याचं या संजय राऊत, अनिल परब या सर्वांना भान आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही!

“राज्यात पोलीस व्यवस्था आहे की नाही?”

“सत्ता असतानाही ते आव्हान देत आहेत, संजय राऊत तर स्मशानात बाकी व्यवस्था करून ठेवा, जर आम्हाला काही धमक्या द्याल तर असं म्हणत आहेत. परबांनी सांगितलं की जोपर्यंत माफी मागत नाही, तोपपर्यंत राणा कुटुंबीयांना आम्ही जाऊ देणार नाही. हे सर्व पाहात असताना राज्यात पोलीस व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे. तुम्ही असं केलं तर स्मशानात पाठवू – हा गुन्हा होत नाही का? घरातून बाहेर पडू देणार नाही असं म्हणणं हा गुन्हा नाही का?” असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

“शिवसेना काय झोपली होती का?”

“संजय राऊत म्हणत होते नवनीत राणांना अमरावतीमधून मुंबईत येऊ देणार नाही. त्या अमरावतीमधून मुंबईत आल्या आणि मातोश्रीच्या दारात पोहोचल्या. कुठे होती शिवसेना? शिवसेना झोपली होती का? का येऊ देणार नाही? मुंबई तुमची आहे का? उगाच बढाया मारतात संजय राऊत. काय करेल शिवसेना? कुठे आहे शिवसेना? मातोश्रीला २३५च्या वर एकही शिवसेना कार्यकर्ता नाही. नवनीत राणांच्या घरासमोर १२५. हजारो शिवसैनिक मातोश्रीवर..कशाला? भीती वाटते शिवसेनेला?” असं देखील राणे यावेळी म्हणाले.

“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

नारायण राणेंचा इशारा

दरम्यान, राणा कुटुंबीयांना त्यांच्या घरातून सुरक्षितपणे बाहेर पडून विमानतळावर जाऊ द्या, असा इशारा राणेंनी दिला आहे. “मी तुम्हाला आत्ताच सांगतो. पोलिसांनी हस्तक्षेप करून राणा कुटुंबाला जाऊ द्या. जर त्यांना कुणी अडवलं, जाऊ दिलं नाही तर मी काही काळानं स्वत: नवनीत राणांच्या घरी जाणार आणि त्यांना बाहेर काढणार. बघुयात कोण येतं तिकडे. मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे. नाहीतर त्याआधी पोलिसांनी राणा दांपत्याला सुरक्षित बाहेर काढावं”, असं नारायण राणे म्हणाले.

“काय घाबरट आहेत शिवसेना कार्यकर्ते. माफी मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही. तक्रार दाखल करून घ्या म्हणे. काय केलं त्यांनी? ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीविताला मुंबईत काही झालं, तर त्याला राज्यसरकार जबादार आहे. बघतो त्यांना किती वाजेपर्यंत जाऊ देत नाहीत”, असं देखील राणे म्हणतात.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane slams shivsena uddhav thackeray on navneet rana ravi rana pmw

ताज्या बातम्या