सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना कडवे आव्हान दिले तरी दुसरीकडे तुतारी चिन्ह घेतलेले दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे तुतारी चिन्ह मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : रायगड मतदारसंघातून आठ उमेदवारांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात, तीन अनंत गीतेंचा समावेश

राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. माढा मतदारसंघ पिंजून काढताना मोहिते-पाटील यांनी तुतारी गावागावात पोहोचविली आहे. गावोगावी मोहिते-पाटील यांचे गावोगावी तुतारी वाजवून होणारे स्वागत पाहता तुतारी प्रसिध्द झाली आहे. तथापि, या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असता रामचंद्र मायप्पा घटुकडे या उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले. हे चिन्ह फक्त तुतारीचे आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजविणा-या माणसाचे आहे. हा यातील फरक आहे. मात्र त्यावरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.