Dhananjay Munde Resignation Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा फेटाळून लावली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून मुंडे यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच वाल्मिकने बीडमध्ये दहशत पसरवली असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अनेक आमदारांनी वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची आणि धनंजय मुडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यावर अजित पवारांनी मंगळवारी (२८ जानेवारी) आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आतापर्यंत अनेक वेळा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधक एका बाजूला कराड व मुंडेंविरोधात आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला वेगवेगळे कथित पुरावे सादर करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पीडित देशमुख कुटुंबाची मागणी लावून धरली आहे. अशातच त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या हत्याकांड प्रकरणातील काही मुद्दे अजित पवारांसमोर मांडले व मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे.

संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले? अंजली दमानियांची प्रतिक्रिया काय?

संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”. दरम्यान, क्षीरसागर यांच्या या पोस्टवर दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आता अगदी स्पष्ट झाले आहे. यांना मित्राला वाचवायचे आहे. त्या मित्राने जनतेला चिरडले तरी चालेल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde resignation is impossible says sandeep kshirsagar anjali damania in santosh deshmukh murder case walmik karad asc