Dhananjay Munde Dasara Melava Speech : विजयादशमीच्या निमित्ताने बीडमधील श्री क्षेत्र भगवान भक्तीगड (ता. पाथर्डी) येथे मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा काही वेळापूर्वी पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी त्यांची व्यथा मांडली. ते म्हणाले “मी काही चूक केलेली नसताना गेल्या २५० दिवसांपासून शिक्षा भोगतोय. या काळात माझ्या बहिणीने मला खूप आधार दिला. माझ्याविरोधात न्यायालायत दाद मागणाऱ्यांना न्यायालयाने दंड ठोठावला आणि मला क्लीन चिट दिली आहे तरी देखील मी अजून शिक्षा भोगतोय.”
धनंजय मुंडे म्हणाले, “मी आजवर अनेक जातींच्या आरक्षणासाठी लढलो आहे. आता सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. त्यांच्या लढाईतही मी सहभागी होतो. आता काही लोकांना ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे. परंतु, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय आधीपासूनच खुला आहे. परंतु, आता काहीजण खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसीतून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजातील लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी जे काही करायला हवं ते आपल्या सरकारने केलं आहे आणि अजूनही करत आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. त्यांना आणखी आरक्षण हवं असेल तर आणखी द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु या ताटातलं त्या ताटात करू नका.”
मी अजूनही शिक्षा भोगतोय : धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे म्हणाले, “मी मागील अडीचशे दिवसांमध्ये खूप व्यथित होतो. माझी मानसिकता इतकी वाईट झाली होती की मला आधाराची आवश्यकता होती. माझी बहीण (पंकजा मुंडे) मला आधार देत होती. प्रसारमाध्यमं माझ्याविरोधात मीडिया ट्रायल घेत होती. पक्षाच्या नेत्यांना माझ्यावरून प्रश्न विचारत होती.
“त्या लोकांनी माझ्याविरोधात घोटाळा काढला आणि न्यायालयात गेले. परंतु, न्यायालयाने मला क्लीनचिट दिली आहे. तसेच माझ्याविरोधात जी व्यक्ती न्यायालयात गेली होती. त्या व्यक्तीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढं करूनही मी अजून शिक्षा भोगतोय. काहीही न करता मी शिव्या खाल्ल्या आहेत.”
आपल्याला जाती-धर्मांमधला द्वेष बाजूला करायचा आहे : धनंजय मुंडे
आमदार मुंडे म्हणाले, मी कधी कोणाला विरोध केला नाही. मी कोणाच्या विरोधात नाही. हा अध्यात्म व शिक्षणासाठी जोडलेला समाज आहे. मला सर्वांना सांगायचा आहे की आपल्या बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण चालू आहे. एकमेकांना न बघणं चालू आहे. जातीमुळे दोन मित्रांची मैत्री तुटत आहे. हे वातावरण आपल्याला बदलायचं आहे. सर्व जातीधर्मांमधला द्वेष बाजूला करायचा आहे. आज दसरा मेळाव्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना हाच संदेश देतो.