भाजपामध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या यंदा कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. “भाजपाच्या खासदारांपेक्षाही मी अधिक आक्रमकपणे भाजपाचे विचार मांडते, लोकसभेत विरोधकांवर टीका करते”, असे नवनीत राणा यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले होते. तसेच भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मात्र मतदानाला आता अवघे तीन दिवस उरले असताना नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका विधानामुळे त्या वादात अडकल्या आहेत. “मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका. २०१९ साली मी अपक्ष असताना जसे काम केले, तसेच करा”, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर नवनीत राणा यांनी सारवासारव केली आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना नवनीत राणा म्हणाल्या की, मतदानाच्या दिवशी आपल्याला सर्व मतदारांना बुथपर्यंत आणायचे आहे. सर्वांचे मतदान होईल, असा प्रयत्न करायचा आहे. मोदींची हवा आहे, या फुग्यात कुणीही राहू नये. २०१९ साली एवढी मोठी यंत्रणा असूनही मी अपक्ष म्हणून जिंकून आले होते.

‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक

विरोधकांकडून टीका

नवनीत राणा यांनी स्वपक्षावरच अप्रत्यक्ष टीका केल्याचा आरोप करून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, भाजपाने ‘अब की पार ४०० पार’ हा नारा केवळ हवा निर्माण करण्यासाठी दिला आहे. मात्र भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी मोदींची हवा नसून कार्यकर्त्यांना त्यांच्यावर विसंबून न राहण्याचा सल्ला दिला. नवनीत राणा यांनी भाजपाच्या फुग्यातील हवा काढली आहे, असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नवनीत राणा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

नरेंद्र मोदींची पोस्ट चर्चेत! “अपयशाने खचून जायचं नसतं, भारतात संधींची कमतरता नाही”

नवनीत राणा यांची सारवासारव

“व्हिडिओ एडिट करून विरोधकांकडून बातमी चुकीची दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना माझे सांगणे आहे की, या देशाची जनता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आहे. पूर्ण देशात कोणतेही विरोधक मोदींसमोर नाहीत. मोदींची हवा होती, आहे आणि राहील. देशाच्या प्रगतीसाठी मोदी हे आवश्यक आहेत. विरोधकांनी ही सगळी यंत्रणा राबविण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.