Eknath Khadse Raised Doubt on Police : पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्राजंल खेवलकर यांना अटक केली असून ते पुण्यातील एका सोसायटीत रेव्ह पार्टी करत होते असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे यांनी आज (२९ जुलै) पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर व हेतूवर संशय व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “अटकेनंतर माझं माझ्या जावयाशी बोलणं झालं आहे. ते मला म्हणाले, ‘मी आयुष्यात कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही. आत्ता देखील मी अंमली पदार्थ घेतले नाहीत’. यासंबंधीचा वैद्यकीय अहवाल समोर आल्यावर सत्य आपल्यासमोर येईल. मद्यसेवनासंदर्भातील अहवाल लगेच समोर आला. मात्र, अंमली पदार्थांसदर्भातील अहवाल का आला नाही? त्यामुळे संशयाला जागा आहे. तसेच ज्या ससून रुग्णालयात अहवाल तयार केला जात आहे. तिथल्या डॉक्टरांनी यापूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अहवाल बदलल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे. त्यामुळे संशय अधिक गडद होत आहे.”

पोलीस डॉ. खेवलकरांवर पाळत ठेवून होते : खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते म्हणाले, “माझ्या जावयाने मला आणखी एक गोष्ट सांगितली आहे की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. पोलीस साध्या कपड्यांमध्ये त्यांच्या मागावर होते. पोलिसांना अशा प्रकारे पाळत ठेवण्याचा अधिकार कोणी दिला. माझे जावई ज्या हॉटेलमध्ये होते तिथे देखील पोलीस त्यांच्या पाळतीवर होते. ज्या पोलिसांनी डॉ. खेवलकर यांना अटक केली. तेच डॉक्टर खेवलकर ज्या हॉटेलमध्ये होते तिथल्या पार्किंमध्ये साध्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत आहेत. हे सगळं संशयास्पद आहे.”

“पोलीस अशा प्रकरणांमध्ये जितकी तत्परता दाखवतायत तशीच तत्परता नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात का दाखवत नहीत? डॉ. खेवलकरांना अटक केली जाते, त्यांचे व्हिडीओ चित्रित करून माध्यमांना पुरवले जातात, तातडीने पत्रकार परिषद घेतली जाते. परंतु, तशीच तत्परता प्रफुल लोढा हनी ट्रॅप प्रकरणात का दाखवली जात नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस त्वरित पुढाकार का घेत नाहीत. नाशिकमधील सेक्स स्कँडलप्रकरणी तातडीने कारवाई का करत नाहीत?”

पोलिसांनी माझ्या जावयाविरोधात कट रचलाय का? एकनाथ खडसेंचा सवाल

“आतापर्यंतच्या कारवाया पाहता पोलीस यंत्रणा केवळ एकनाथ खडसेंना बदनाम करण्यासाठी काम करतेय असं दिसतंय. वारंवार खडसेंचा जावई असा उल्लेख केला जातोय. त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर जरुर कारवाई करा. मात्र, कोणी कट रचून खेलवकर यांच्या मागे लागलं असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.”

एकनाथ खडसे म्हणाले, “पोलिसांनी कारवाई करताना फोटो काढले, व्हिडीओ चित्रित केले जे माध्यमांना पुरवले, यामागे त्यांचा उद्देश काय होता? तसेच त्यांनी डॉ. खेवलकर यांचा जुना लॅपटॉप व मोबाइल देखील जप्त केला आहे. त्यातील खासगी फोटो जारी केले आहेत. पोलीस अशा प्रकारे खासगी आयुष्यात हस्तक्षेप का करत आहेत? पोलीस बाहुल्यांप्रमाणे काम का करत आहेत?”