भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मगळवेढ्यातील एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. पाटील म्हणाले होते. मविआ सरकारच्या काळात कोणत्याही क्षणी फडणवीसांना अटक झाली असती. मविआ सरकारच्या काळात ३३ महिने आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे. परंतु, आम्हाला खात्री होती हेही दिवस सरतील. परंतु, आमच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले. ते मुख्यमंत्री झाले आणि आमचं सरकार आलं. पाटील यांच्या या दाव्यावर तेव्हाच्या मविआ सरकारमधील मंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी (२१ एप्रिल) टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या अटकेबाबतच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मला त्याबाबत अशी माहिती आहे की, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मविआ सरकारने काही खटले दाखल करून या लोकांना अटक केली असती. तसेच २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचाही कट त्यांनी (मविआने) रचला होता.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीचं सरकार असताना आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. तेव्हा मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या ३३ महिन्यांच्या काळात आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे.

हे ही वाचा >> “केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”

उद्धव ठाकरेंबरोबर वादाची ठिणगी का पडली? एकनाथ शिंदे म्हणाले…

यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली? त्यावर शिंदे म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि तास वाट पाहायला लावली. हे नेहमीच व्हायचं. दोन वर्षे हे सातत्याने होत होतं. अखेर, राज्यसभा निवडणुकीवेळी मला चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंदेखील काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. अशा अनेक गोष्टी घडत होत्या.