शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झाल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत पार पडलंं त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं आहे?

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मी आज कोल्हापूरच्या राणीसाहेब ताराबाई, जिजाऊ माता यांना अभिवादन करते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले मी तर असं म्हणेन की लाखो बहिणींचे भाऊ आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने डेडिकेटेड मिनिस्टर, कॉमन मॅन असे एकनाथ शिंदे. इथे त्या काही क्षण थांबल्या आणि लगेच म्हणाल्या, साहेब एक शब्द म्हणणार होते पण तो थांबवला आहे, महिलांच्या मनातले मुख्यमंत्री. अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. पण माननीय शिंदेसाहेब तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना कधीही विसरत नाही.

मी दरवर्षी एक पुस्तक लिहिते-नीलम गोऱ्हे

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी दरवर्षी एक पुस्तक लिहिते, महिला धोरण, स्त्री सशक्तीकरण यावर आधारीत हे विषय असतात. दारू विरोधात महिलांनी आंदोलनं केली, त्या प्रकरणात महिलांवर दाखल असलेले ३२ हजार गुन्हे आमच्या सरकारच्या काळात मागे घेण्यात आले. महिलांना येणाऱ्या अडचणी यावर मी मुंबई सकाळमध्ये एक सदर लिहित होते, त्या सर्व लेखांवर आधारीत हे पुस्तक आहे. टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते. त्यामुळे तुम्ही सविस्तर बोला, असंही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती, त्यांनी यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं.

एकनाथ शिंदे यांच्याकडूनही नीलम गोऱ्हेंचं कौतुक

आपल्या सगळ्याची लाडकी बहीण नीलम गोऱ्हे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. ज्ञानाचं खोरे म्हणजे निलम ताई गोऱ्हे. राजकारणात काही जणं दिशाहीन झालेले असताना, नीलमताईंनी बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली. नीलमताईंना मी सांगितलं एक पुस्तक लिहा. आमचा उठाव हे खूप कठीण काम होतं. सगळ्यांना माहितीये त्यावेळेची परिस्थितीत काय होती. एकही माणूस असा नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. आपण घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेतली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.