राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या म्हणजेच ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यातच दुसरीकडे गुवाहाटीमध्ये असणाऱ्या बंडखोर आमदारांनी या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. असं असतानाही या बंडखोर आमदारांमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये समेट होण्याची शक्यता आहे की नाही याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिताना अशाप्रकारच्या सर्व शक्यता संपल्याचे स्पष्ट संकेत दिलेत आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

केसरकर हे मागील काही दिवसांपासून वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. आज सकाळी राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासंदर्भातील पत्र विधानसभेच्या सचिवांना पाठवल्यानंतर ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी केसरकर यांनी चर्चा केली. यावेळी राज्यपालांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायलयात जात असल्यावरुन केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी, “तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी करावी याचिका, आमचं काहीही म्हणणं नाही,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

पुढे बोलताना केसरकर यांनी, “कालपर्यंत आम्ही त्यांना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार आणि त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) अधिक प्रिय आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे बोलताना, “हे सर्वांना (सर्व शिवसेना आमदारांना) मान्य होणारं नाही. त्यामुळे यापुढे काही चर्चेची अपेक्षा आहे असं वाटतं नाही
आता वेळ निघून गेलेली आहे आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल,” असं केसरकर यांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> मुख्यमंत्र्यांविरोधात विश्वासदर्शक ठराव : “काहीही झालं तरी ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत…”; राज्यपाल कोश्यारींचे स्पष्ट निर्देश

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी राज्यपालांनी राज्याच्या विधानसभेचे सचिवांना ३० जून रोजी विशेष अधिवेशनासंदर्भातील तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणं या उद्देशाने अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.