Devendra Fadnavis Birthday Eknath Shinde Wish: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अशात राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन्ही सहकाऱ्यांना एक्सवर पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे”, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
विश्वासाचा हात….
आपल्या पोस्टच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी, “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे. महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!”, असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, “सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृद्धीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेले बुद्धिमान तसेच ‘व्हिजनरी’ नेतृत्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”
वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा
एका वेगळ्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेले उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”
दरम्यान, नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन आमदारांच्या कार्यकर्त्यांची मारहाण ते कृषीमंत्री सभागृहात पत्ते खेळत असल्याचा कथित व्हायरल व्हिडिओपर्यंत गाजले. याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मिश्किलपणे दिलेल्या महायुतीत येण्याच्या ऑफरचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.