वाई:उदयनराजेंना भाजपाने उमेदवारी नाकारलेली नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे मात्र महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात तीन जागांच्या पक्षांमध्ये जागा वाटपामध्ये तानातानी  सुरु आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जागा जाहीर करायला वेळ लागत आहे अशी माहिती भाजपाचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा पेच कायम आहे. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागत असल्याने खासदार उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीला जागा सोडल्याची चर्चा साताऱ्यात असताना खासदार उदयनराजे यांनीही रोखठोक भूमिका घेतली आहे. खासदार उदयनराजे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.  रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना लोकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठ्या  मताधिक्याने उदयनराजेंना निवडून आणावयाची असल्याचे या वेळेला ठरविण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांच्याशी चर्चा करण्यासाठी  गिरीश महाजन आज  साताऱ्यात आले. त्यांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांत तासभर बंद दाराआड चर्चा झाली.त्यानंतर त्यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचीही भेट घेतली.

हेही वाचा >>> इक्बालसिंग चहलांना आयुक्तपदावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट; म्हणाले, “प्रत्येक घोटाळ्याची…”

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी उदयनराजे हे भाजपातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपानेच त्यांना स्वतःहून उमेदवारी दिली पाहिजे असे सांगितले. सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राबद्दल  तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे काही वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यातील प्रचारासाठी त्यांची भूमिका, त्यांची वेळ जाणून घेण्यासाठी  याबाबत चर्चा करण्यासाठी मी साताऱ्याला आलो. त्यांच्या उमेदवारीचा कोणताही तिढा नाही. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फार थोडा कालावधी शिल्लक असल्याने लवकरच पश्चिम महाराष्ट्र बाबत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. मात्र उदयनराजेंना उमेदवारी नाकारलेले नाही, त्यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी पुन्हा सांगितले.   गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीला सोडून सातारची जागा भाजपला घेण्याचा घेण्याची चर्चा पक्षात सुरू आहे का असे विचारले असता याबाबत मला काहीच माहित नाही. 

हेही वाचा >>> राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

भाजपाच्या जागा वाटप कमिटीमध्ये मी नाही. त्यामुळे मला यापेक्षा अधिक ची माहिती नाही. मात्र यामध्ये माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्राच्या पार्लमेंटरी कमिटी मध्ये फडणवीस आणि बावनकुळे आहेत.वंचित आघाडीचा जागा वाटपाचा विषय आणि महाविकास आघाडी हा त्यांच्यातील विषय आहे. त्याविषयी बोलणं योग्य नाही. त्यानंतर त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही भेट घेतली. या दोघांमध्ये ही बराच वेळ चर्चा झाली.    माढा येथे लोकसभा मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर काही वाद निर्माण झाले आहेत.  ते जाणून घेण्यासाठी रविवारी अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. रणजितसिंह  नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते पाटील यांचे  कार्यकर्ते आणि परिसरात नाराजी आहे. मी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्या वरिष्ठ पातळीवर पोचवल्या आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्यातून योग्य तो मार्ग निघेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan in satara for discussion with udayanraje bhosale over lok sabha candidate zws