राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या हे स्पष्ट होत नाही. तरीही बहुतेक नेत्यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखल्याचे चित्र आहे. दरम्यान महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा आणि शिंदे गटाला ३०१३ सरपंच व इतर १३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४०१९ सरपंच निवडून आले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले.

ग्रामपंचायतीतील यशावर सर्वपक्षीय दावेदारी; भाजप सर्वात मोठा पक्ष; महाविकास आघाडीला जास्त जागा

दरम्यान या ग्रामपंचायतींचे निकाल लागायच्या अगोदरच भाजपा – शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या असे जाहीर केले ते धादांत खोटे होते. ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठी पाठबळ उभे केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

भाजपाचा आपणच एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा

राज्यातील २४८२ ग्रामपंचायती जिंकून भाजपाने राज्यात पहिला क्रमांक कायम ठेवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ८४२ ग्रामपंचायती जिंकल्याची माहिती भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली. भाजपाच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाला यश मिळाल्यानेच विधान भवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी परस्परांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या वेळी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.

काँग्रेसने ९०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या असून, महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंचपदे जिंकल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच आम्हीच पहिल्या क्रमांकावर आहोत हा भाजपचा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील २३६ पैकी २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या असून ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट असल्याचे स्पष्ट होते, असेही पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीनेही १३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. मनसेला मिळालेल्या यशाबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समाधाने व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat election result ncp ajit pawar claims mahavikas aghadi gets more seats sgy