गेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगलं होतं, तो मेळावा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी धुळ्यात बोलताना शिवसेनेवर तोंडसुख घेतलं. यावेळी त्यांनी एक भाकित वर्तवताना शिवसेनेला गंभीर इशाराही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगासमोर काय होणार?

धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगासमोर आला आहे. यासंदर्भात आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर हे चिन्ह दोन्हींपैकी एका गटाला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा आत्तापर्यंत केला जात होता. मात्र, आता त्यापुढे एक पाऊल जात धनुष्यबाण आपल्याकडे आल्यानंतर शिवसेनेतले अजून आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

शिवसेनेत पाच आमदारही शिल्लक उरणार नाहीत, असा दावा गुलाबराप पाटील यांनी केला आहे. धुळ्यात सभेत बोलताना ते म्हणाले, “मी लिहून देतो.. ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल, १५ पैकी तिथे ५ आमदारही तिकडे दिसणार नाहीत. ते तर फक्त धनुष्यबाण इकडे येण्याची वाट पाहात आहेत”, असं पाटील यावेळी म्हणाले.

“ज्याच्याकडे जास्त आमदार, जास्त खासदार, ज्याच्याकडे पक्षाचे जास्त लोक असतात, त्याला चिन्ह मिळतं. आम्हाला खात्री आहे की, धनुष्यबाण आम्हालाच मिळेल”, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

“मेळावा ऑफलाईनच व्हावा, मजा येईल”

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा ऑनलाईन झाला पाहिजे अशी टीका विरोधकांकडून होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मेळावा ऑनलाईन नाही ऑफलाईनच झाला पाहिजे. मजा येईल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil mocks shivsena uddhav thackeray on dussehra melawa rno news pmw
First published on: 01-10-2022 at 14:46 IST