मागील काही दिवसांपासून नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन सारवासारव करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला.

राऊतांच्या या आरोपाला शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अवघे तीन ते चार महिने झाले आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणे, हे बालिशपणाचं लक्षण आहे. दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं. केंद्रातून काही योजना किंवा पैसे आणायचे असतील, तर ते दिल्लीला जातात. योगायोगाने हे प्रकरणही एकाचवेळी आलं तर ते सारवासारव करायला गेले, असा आरोप करणं उचित नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.

हेही वाचा- “…आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”; देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत BJP च्या माजी खासदाराचं विधान

दुसरीकडे, नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची मांडणी केली होती. या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला पूर्ण वेळ मिळाला नाही. त्यामुळे खडसे यांनी मांडलेल्या विषयांना उत्तर देता आलं नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. आपल्याला आणखी जरा वेळ मिळाला असता तर आपण ‘विट का जवाब पत्थर से’ दिला असता, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. ते पाळधी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.