राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं सोमवारी (३१ ऑक्टोबर) भाषण सुरू असतानाच मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाल्याचा प्रकार घडला. अजान सुरू होताच गुलाबराव पाटलांनी आपलं भाषण थांबवलं. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण सुरू केलं. ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यासाठी आले असताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या भाषणात गुलाबराव पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वांचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री झाला आहे. मात्र, आमचं नाव अलीबाबा आणि चाळीस चोराप्रमाणे झालंय. आमची बदनामी सुरू आहे. आम्ही जे केलं ते सदसदविवेक बुद्धीने केलं आहे, बाळासाहेबांसाठी, भगव्या झेंड्यासाठी, राज्याचं भलं व्हावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

व्हिडीओ पाहा :

“…तर तुमची ‘सुरत’ (चेहरा) तुटल्याशिवाय राहत नाही”

“मी तर ३३ व्या क्रमांकाला एकनाथ शिंदेंसोबत गेलो. माझ्या आधी तर खूप लोक गेले होते. आम्ही पहिल्यांदा २०-२२ आमदार उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, आमदार वापीपर्यंत पोहचले आहेत, त्यांना परत बोलवा. ते सुरतमध्ये घुसले तर तुमची ‘सुरत’ (चेहरा) तुटल्याशिवाय राहत नाही,” असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं.

“”उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही”

“उद्धव ठाकरेंना आमदारांना परत बोलवा असं सांगूनही त्यांनी २२ आमदारांचं ऐकून घेतलं नाही. तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हीही जा म्हणाले. कोणीही का असेना, पण माणसाला राग येतो,” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.

हेही वाचा : “हे तीन महिन्याचं बाळ, त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत म्हणाले होते की, हे दिसायला सिंहाप्रमाणे आहेत, पण मन उंदराप्रमाणे आहे. त्यांना माहिती नाही की उंदीर एकदा घुसला तर चांगल्या चांगल्यांना कुरतडतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil stop his speech after azan during talking in jalgaon pbs