बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपाेषणावर राज्य सरकारने काढलेला आदेश आरक्षणाच्या संदर्भाने काढलेला मार्गदर्शक आराखडा (रोड मॅप) आहे. आदेशामध्ये ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचे कुठेही नमूद नाही. परंतु या आदेशाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, असे सांगत राज्यातील माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) हर्षवर्धन पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पवार कुटुंबीयांनी रसद पुरवण्यात आल्याच्या संदर्भाने करण्यात येणारी वक्तव्ये चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. ते परळी येथे माध्यमांसमोर शुक्रवारी बोलत होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या बारामतीत शुक्रवारी काढलेल्या मोर्चावर पाटील म्हणाले, की लोकशाहीत कोणालाही मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. जरांगे यांना शरद पवार कुटुंबीयांनी रसद पुरवल्याचा प्रा. हाके आरोप करत आहेत, त्यांनी तसे पुरावे द्यावेत. अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचे समोर आल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर ते म्हणाले, की याबाबतची सत्य परिस्थिती तपासून घेतली पाहिजे. अधिकाऱ्याचे ऐकून घेतले पाहिजे. राज्यकर्त्यांनी अशा प्रसंगाच्या वेळेला संयमाने घेतले पाहिजे.