Maratha reservation movement: अहिल्यानगर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राजधर्म पाळण्यास तयार नाहीत, त्यांनी पूर्वी ७ दिवसांत निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी जाहीर केले होते, त्याचे काय झाले? आता सरकार त्यापासून पळ काढत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नगरमध्ये बोलताना केला.

गणपतीने मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांची दुर्बुद्धी दूर करावी, अशी प्रार्थना करतो असेही प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. आंदोलकांचे हाल करण्याचा सरकारचा कुटील डाव दिसतो, खरंतर या प्रश्नाला सामाजिक आयाम आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून मराठा-ओबीसी यांच्यामध्ये द्वेषाचा विचार पेरला जात आहे. त्याला तिलांजली देण्यासाठी तरी राजधर्म पाळावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आंदोलकांना एकएक दिवस मुदतवाढ दिली जात आहे. आंदोलकांची एवढी अफाट गर्दी आहे. मग पोलीस काय झोपले होते का? कुंभमेळ्याच्या वेळी केली जाते तशी व्यवस्था करायला काय हरकत होती? सरकारचे ते मूलभूत कामच होते, म्हणूनच आम्ही त्यांना राजधर्म पाळा असे म्हणत आहोत, असेही सपकाळ म्हणाले.

आंदोलन काही एकदम मुंबई धडकलेले नाहीत. तीन महिने अगोदर त्यांनी आंदोलन जाहीर केले होते, त्यावेळेस सरकार झोप काढत होते का? आरक्षणावर आंदोलकांशी चर्चा करायला हवी होती, परंतु राजधर्म पाळण्यास देवेंद्र फडणवीस तयार नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. गणपतीने त्यांना सुबुद्धी द्यावी व त्यांची दुर्बुद्धी दूर करावी.

काँग्रेसने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. सर्वपक्षीय निवेदन व विधानसभेतही ठरावाच्या बाजूने काँग्रेस उभी राहिली. परंतु त्यावेळी सात दिवसात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते, त्याचे काय झाले? मागील वेळी मुंबईत आंदोलन वेशीपाशी आल्यावर काय सांगितले होते आणि कोणत्या कारणाने गुलाल उधळला गेला होता. त्यामुळे सरकारने आता पळ काढू नये. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यासाठीच काँग्रेसला जातनिहाय जनगणना हवी आहे. ‘जिसकी जितनी हिस्सेदारी, उतनी उसकी भागीदारी’ या आधारावर काँग्रेस पक्ष देशभर आक्रमक भूमिका घेऊन जात आहे. काँग्रेसचे राज्य असलेल्या तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना करून काँग्रेसने सर्व घटकांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या प्रश्नावर मागे नाही असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास सपकाळ नगरमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील भूमिका स्पष्ट केली.